पंकजा मुंडेंच्या पिंपरीतील सभेत गोंधळ, सरकारविरोधात घोषणाबाजी

हक्कांचे घर हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी नाही आले, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

पिंपरी | पंकजा मुंडे यांच्या सभेदरम्यान पिंपरीमध्ये काही नागरिक आणि महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अनधिकृत बांधकाम कर प्रश्न का सोडवला नाही याविषयी संतप्त आंदोलकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घोषणाबाजी करणारे तिघे हे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची पिंपरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला. हक्कांचे घर हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी आले नाही, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खरंतर पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गावर अनेकांची घरं ही बेकायदेशीर आहे. आता त्या घरांवर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण हातोडा चालवणार आहे. आमची घरं नियमित करण्यात यावी अशी मागणी या बाधित लोकांनी भाजपकडे केली. यासाठी त्यांच्याकडून विविध आंदोलने करण्यात आली. यानंतर भाजपने योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. याच कारणाने कृती समितीच्या सदस्यांनी आज पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला.

यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, विरोधकांनी माझ्या सभेमध्ये असे लोक पाठवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे लोक पाठवल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराचे बहुसंख्य प्रश्न गेल्या पाच वर्षात मार्गी लागले असल्याचे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच जे प्रश्न मार्गी लागले नाहीत ते सोडवण्यासाठी आगामी काळात शहराची पालक म्हणून काम करेल असे आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिले.



AM News Developed by Kalavati Technologies