गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच पारंपारिक धान शेतीला फाटा देत फुलली संत्र्याची बाग

वर्षातून दोनदा उत्पन्न, 50 हजारांच्या लागणीतून पाच लाखांचे उत्पन्न

गोंदिया । गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पश्चिम विदर्भातील संत्र्यांच्या शेतीची मक्तेदारी मोडित काढत यशस्वी संत्र्याच्या शेतीचा प्रयोग केला. सौंदड येथील शेतकरी जैपाल मारवाडे या शेतकऱ्याने दोन एकरात संत्र्याची लागवड केली. संत्र्याची शेती करणारे भंडारा अन गोंदिया जिल्ह्यातील एकमेव शेतकरी असून ते एकटेच नाही तर त्यांचे संपूर्ण कुटूंबच संत्र्याच्या शेतीत रंगलं आहे. धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, आता शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत नगदी पिके घेण्याकडे वळले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील शेतकरी जैपाल मारवाडे यांच्या वडीलांनी ४३ वर्षांपूर्वी प्रथम संत्र्याची शेती सुरु केली. आता जैपालसुद्धा संत्राशेती करत आहे. दोन एकरात १८९ संत्री व ११ मोसंबीची झाडे आहेत. एका झाडापासून १०० किलो संत्री निघतात. त्यामुळे त्यांना दोन एकर संत्री शेतीतुन ५ लाखाचे उत्पन्न मिळतेय. पारंपरिक धान शेतीला फाटा देत संत्र्याच्या शेतीकडे आता येथील शेतकरी वळत आहेत.

त्यांच्या या शेतीला त्यांची पत्नी शीतल मारवाडे, भाऊ दिगंबर, विजय मारवाडे आणि संपूर्ण कुटुंबच मदत करत असतात. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची शासकीय मदत तर घेतलीच नाही. मात्र कृषी विभागाचेही मार्गदर्शन घेतले नाही. जैपाल हा संत्र्याची शेती करणारा जिल्ह्यातील एकमेव शेतकरी असून त्याच्या संत्र्याची मागणी आता कलकत्ता, राजस्थान, मध्यप्रदेशसह इतर राज्यातही होऊ लागली आहे. तेव्हा आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक धान शेतीला फाटा देवून संत्रा शेतीकडे वळणे गरजेचे आहे.AM News Developed by Kalavati Technologies