श्रीगोंदा । श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी विजेचे शॉर्ट सर्किट झाल्याने, आगीच्या ठिगण्या ऊसाच्या फडाच पडून तब्बल चार एकर उस जळून खाक झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील भिंगान-श्रीगोंदा रोडवर घोड कॅनल जवळ गट क्रंमाक 284 मध्ये भानुदास भिसे व बापूराव भिसे यांची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीत दोन्हीही भावांनी ऊसाची लागवड केली होती. सध्या गळीत हंगाम सुरु झाल्याने, पहिल्याच टप्पात त्यांच्या ऊसाला कारखान्याकडून तोडणी भेटली होती.
त्यामुळे ऊसतोड चालू असताना, शेताच्या वरून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे गोळे शेतात पडू लागले. त्यातील एक विजेची तार एका बंद असलेल्या लाईनवर कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा आगीचा मोठा डोंब उसळला आणि ऊसाने पेट घेतला. घटनास्थळी आग विजवण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे, सर्वांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. मात्र पोटाला पिळा देऊन जगवलेला चार एकर ऊस वसुबारसेच्या दिवशी डोळ्यासमोर जळताना पहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.