#Budget2020| आता स्मार्ट होणार वीज मीटर, रिचार्ज केल्यावरच घरात येणार वीज

यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. वीज चोरी रोखण्यासाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरात 1 एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटमध्ये याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने यासाठी 2022 चे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर वीज हवी असल्यास रिचार्ज करावे लागणार आहे. रिचार्ज केलेले नसेल तर घरात वीज पुरवठा होणार नाही. मोबाइल फोन प्रमाणे आता वीजेच्या मीटरला रिचार्ज करणे बंधनकारक असणार आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील दुसरा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करत आहेत. यामध्ये केलेल्या घोषणेनुसार दोन वर्षांमध्ये घरातील सर्व मीटर प्री पेड केले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने जुने मीटर हटवण्यात येतील. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय केला जाणार आहे. यामध्ये वीजेचा दर निवडण्याचा पर्याय असेल. यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी स्मार्ट प्री पेड मीटरचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये याची मागणी वाढणार आहे. यामुळे यापूर्वीच प्रीपेड मीटर बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies