शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन, शरद पवारांनी ट्विटरवर वाहिली भावनांजली

ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत शरद पवारांनी केले विनम्र अभिवादन...

मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्त मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यभरातून शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. इकडे राजकीय पटलावरही अनेक दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत विनम्र अभिवादन केले आहे. शरद पवार लिहितात, "प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!"

शरद पवार आणि बाळासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण देशाला माहिती आहेत. आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी याच मैत्रीला एक पाऊल पुढे नेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होऊ घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून खलबतं सुरू आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सत्तेतील वाटपासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या असून त्याला अंतिम रूप येणे बाकी आहे. यामुळे मात्र महाराष्ट्रात सत्तास्थापनेला उशीर होताना दिसून येत आहे. AM News Developed by Kalavati Technologies