शरद पवारांनी कोल्हापुरात पूरग्रस्तांसह साजरा केला स्वातंत्र्यदिन अन् राखीपौर्णिमा

आज संकट मोठं आहे, आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ - शरद पवार

कोल्हापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे आश्रयाला आलेल्या पूरग्रस्त कुटुंबातील भगिनी व बांधवांसह देशाचा 73वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. झेंडावंदनानंतर शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. ध्वजारोहणाच्या ठिकाणी उपस्थित महिलांनी शरद पवारांना राखी बांधून आपली आस्था आणि आपुलकी व्यक्त केली. यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर नगरी ही शाहू महाराजांची नगरी आहे. राजर्षी शाहूंनी देशाला एकसंघ राहण्याचा संदेश दिला. आज संकट मोठं आहे, आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ. 

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमधील पूरग्रस्त छावणीत पवारांनी ध्वजारोहण केलं. या छावणीत आंबेवाडी, चिखली, सिद्धार्थनगर आणि सुतार मळा या परिसरातील पूरग्रस्त नागरिक राहायला आहेत. ध्वजारोहणानंतर पूरग्रस्त महिलांनी शरद पवारांना राखी बांधली. यावेळी पूरग्रस्तांची संवाद साधताना पवारांनी या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाई मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला. तसेच पूरग्रस्त नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तत्पूर्वी फेसबुकवरून शुभेच्छा संदेश त्यांनी दिला. यात शरद पवारांनी म्हटले की, "भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन करतानाच आपला देश शिक्षित, स्वच्छ, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आपण सगळेच प्रतिज्ञा घेऊया. देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा न येवो, सांप्रदायिक शक्तींना बळ न मिळो आणि देशाच्या एकसंधत्वाचे आणि विकासाचे स्वप्न साकारण्यात आपला सर्वांचा सहभाग देण्याचा, आज ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना प्रण करूया. सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली. येऊ घातलेली निवडणूक लक्षात घेता विधानसभेची मुदत संपत असल्याने अतिशय शीघ्र गतीने काम करण्याची गरज आहे. एकदा सर्वजण निवडणुकीच्या कामात गुंतले तर हे निराधार झालेले लोक मदतीपासून वंचित राहतील, याचा विचार व्हायला हवा. तसेच सरकारने शहरी भागाला प्रतिकुटुंब ७,५०० तर ग्रामीण भागाला ५ हजार रुपयांची मदत देऊ जाहीर केली आहे. लोक संकटात आहेत, अशावेळी सरकारने असा दुजाभाव ठेवू नये, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही पवार म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies