यंदाची ईद घरातच साजरी करा, नवाब मलिक यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्त राज्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतीही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक विधी घरीच केले. आता अजुनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने तसेच राज्यातील लॉकडाऊनही सुरु असल्याच्या कारणाने रमजान ईदची नमाजही घरीच पठण करण्यात यावी असे आवाहन विविध मुफ्ती, हजरात व मौलाना आदींनी केले आहे. त्यास अनुसरुन रमजान ईदचे सर्व धार्मिक विधी घरीच करावेत असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

तसेच ईद नंतर गल्ली, मोहल्ल्यांमध्ये गर्दी करु नका. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवरुनच नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्या तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना करावी असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies