नवाब मलिक यांचा नितीन गडकरींना टोला, 'कर दिया ना क्लीन बोल्ड'

महाविकासआघाडीचे नेते भाजपाला चिमटा काढायची एकही संधी सोडत नाहीयेत

मुंबई । महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध केलेलं बंड फसलं आहे. यानंतर आता महाविकासआघाडीचे नेते भाजपाला चिमटा काढायची एकही संधी सोडत नाहीयेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे.

'क्रिकेट आणि राजकरणात काहीही घडू शकतं. ज्यावेळी आपण सामना हरतोय असं आपल्याला वाटतं, तेव्हा नेमकं त्याच्या उलट होतं', असं विधान नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सत्तापेचासंदर्भात केलं होतं. भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाला होता. त्यामुळे जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. त्यावेळी, गडकरींनी क्रिकेट आणि राजकारणातील साम्य सांगत, युतीचंच सरकार येईल, अशी आशा व्यक्त केली होती. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या वाक्याची चर्चा झाली होती. आता आज या दोघांच्या राजीनाम्यानंतर, त्याच वाक्यावरून नवाब मलिक यांनी त्यांची विकेट काढायचा प्रयत्न केलाय.

क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले होते. परंतु, शरद पवार हे आयसीसीचे अध्यक्ष होते, हे बहुधा नितीन गडकरी विसरले असावेत. आता केलं ना क्लीन बोल्ड?, असा यॉर्कर त्यांनी टाकला आहे.AM News Developed by Kalavati Technologies