परभणीत 10 रूपयात नारायणच्या आजीची झुणका भाकर

शिवसेनेने दिलेले वचन पुर्ण करण्याआधीच युवकाने सुरू केला व्यवसाय

परभणी । आर्थिक मंदीने मोठ-मोठ्या कंपन्यातील कर्मचारी कपात झाल्याचे आपण रोजच ऐकत असतो. परंतू कष्ट करून पोट भरणार्‍यांना कसली आर्थिक मंदी. ? स्व:ताच्या हातावर संपूर्ण विश्‍वास ठेवून पडेल ते काम करणारा कधीच उपाशी झोपत नसतो. परभणीतील चक्रवर्ती वाघमारे यांनी गोरगरीबांना जेवणाचा जास्त खर्च पडू नये, म्हणून झुणका भाकरीचा व्यवसाय सुरु केला आहे. अवघ्या 10 रुपयात घरपोच व हवी तेथे झुणका भाकर पोहचविली जाते.

सकाळी सात वाजल्यापासून चक्रवर्ती वाघमारे यांचे दोन कर्मचारी त्यांची इलेक्ट्रीकवर चालणारी अ‍ॅटोरिक्षा काढतात. त्यात ताज्या-ताज्या भाकरी व त्यासोबत झणझणीत झुणका घेवून दोन्ही कर्मचारी संपूर्ण शहरात फिरत असतात. शासकीय कार्यालये, संस्था आणि इतकेच काय तर कुणी फोन करून ऑर्डर दिली तर थेट घरी देखील हा मेणू पोचविला जातो. गेल्या दोन महिन्यापासून वाघमारे हे या व्यवसायात गुंतले आहेत. दररोज शहरातील रेल्वे स्थानक, न्यायालय, आरटीओ ऑफीस, वसतम रोड, काळी कमान, सरकारी दवाखाना, विसावा कॉर्नर, गणपती चौक, अपना कॉर्नर, गंगाखेड नाका, शिवाजी चौक, शनिवार बाजार, खंडोबा बाजार व नवामोंढा सारख्या वर्दळीच्या ठिकाणी हे कर्मचारी स्व:ताची रिक्षा घेवून फिरत असतात. सुरुवातीच्या काळात थोडी मेहनत जास्त घ्यावी लागली. परंतू आता लोकांना माहित झाले आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयातून व इतर ठिकाणाहून आपल्याला फोन द्वारे ऑर्डर दिल्या जातात.

नारायणच्या आजीचा इतिहास
या झुणका भाकर सेवेला नारायणच्या आजीची झुणका भाकर असे नाव का पडले तर त्यामागे एक घटना आहे. चक्रवर्ती वाघमारे यांच्या दुकांनात नारायण नावाचा व्यक्ती मेकॅनिकचे काम करतो. त्याची आजी नांदेड येथे रुग्णालयात भरती होती. आजी व त्यांच्या देखभाली साठी राहणार्‍या व्यक्तीचा डब्बा दररोज रेल्वेने एका मुलासोबत पाठवीत असे. हे कळल्यानंतर चक्रवर्ती वाघमारे यांच्या डोक्यात ही कल्पना सुचली. आपल्या शहरात उपचारासाठी येणारे हजारो लोक आहेत. त्यांना कमी पैश्यात आपण काही खाद्य देऊ शकलो तर कसे होईल. यातूनच 10 रुपयांत झुणका भाकर ची संकल्पना समोर आली. परंतू ही कल्पना नारायणच्या आजीमुळे सुचली होती. त्यामुळे या सेवेला नारायणच्या आजीची झुणका भाकर असे नाव देण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies