नंदुरबार | शहादा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी

शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरात वादळ वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नंदुरबार | जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरात वादळ वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, एकीकडे कोरोणाचे संकट तर दुसरीकडे पावसामुळे परीसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. महसूल विभागाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. जून महिन्याच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला होता. गेल्या पंधरा दिवसापासून परिसरातील शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होता. मध्यरात्री सलग एक तास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात ऊस, केळी, पपई, मिरची, कापूस ह्या नगदी पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांचा शेतात पावसाचे पाणी साचून तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी होऊन मोठे नुकसान झाले आहे. यात वडाळी, बामखेडा, जयनगर, खैरवे - भडगाव या भागात ऊस पूर्णपणे आडवा झालेला असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेले आहे. महसूल व कृषी विभागाने खैरवे - भडगांव शिवारात पडलेल्या वादळ वा-यासह पावसामुळे ऊस पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून, वादळी वारा व जोरदार पाऊसामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies