तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर धावली नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस

रेल्वे प्रशासनाने 1 जूनपासून देशभरात 200 विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता

नांदेड | लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर तब्बल सव्वा दोन महिन्यांनंतर आज नांदेड- अमृतसर सचखंड एक्सप्रेस पुन्हा धावली. नांदेडहुन 425 प्रवासी तर नांदेड विभागामधून 950 प्रवासी या रेल्वेने खांडवा, इटारसी, भोपाळ, दिल्ली,अमृतसरला रवाना झाले. अशी माहिती नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंग यांनी दिली. आज धावलेल्या नांदेड- अमृतसर विशेष एक्सप्रेस रेल्वेला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्रसिंघ बुंगई, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सचखंड एक्सप्रेसला वातानुकूलित व विनावातानुकूलि असे 22 डब्बे जोडण्यात आले होते. सामान्य डब्बे या रेल्वेला नसल्याने आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी होती.

रेल्वेच्या एक तास आधीच प्रवासी रेल्वे स्थानकात येत होते, यावेळी कोविड-19 च्या मार्गदर्शक नियमानुसार येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे तापमान तपासण्यात आले. तब्बल सव्वा दोन महिन्यांनंतर धावणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर विविध तयारी करण्यात आली होती. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या वतीने भाविकांना सीलबंद जेवणाची पाकिटे व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले.प्रवाशांच्या तिकीटासाठी नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्र 22 मे पासून सुरू करण्यात आले होते. श्रमिक रेल्वेनंतर रेल्वे प्रशासनाने 1 जूनपासून देशभरात 200 विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता यात नांदेड विभागातील सचखंड एक्सप्रेसचा देखील समावेश होताAM News Developed by Kalavati Technologies