नागपूरात महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याला भाजप आमदाराने शिवीगाळ केल्याने, कामबंद आंदोलन पुकारले आहे

नागपूर । महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याला भाजप आमदाराने शिवीगाळ केल्याने नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नागपूर महापालिकेच्या नगररचना विभागातील सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना भाजप आमदार प्रवीण दटके यांनी त्यांच्या प्रभागातील काही कामानिमित्त फोन केला, परंतु आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने त्यास्थळी भेट देऊ शकत नसल्याचे प्रमोद गावंडे यांनी सांगितले. परंतु यावर चिडून जाऊन आमदार दटके यांनी गावंडे यांना अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा आरोप गावंडे यांनी केला.

आमदाराने महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची माहिती समजताच महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. तसेच पदाधिकाऱ्यांच्या कुठल्याही बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय देखील महापालिका कर्मचार्यांनी घेतला आहे. मागण्याचे निवेदन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन आयुक्त मुंढे यांनी दिले आहे. सोबतच अत्यावश्यक सेवा खंडित करू नये असे आवाहन मुंढे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies