"असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडावे", शिवसेना मंत्र्यांचा सणसणीत टोला

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.

‘मागे 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही होते. त्यामुळे सरकार बदलले म्हणजे पोलीस बदलले असं होत नाही. ज्या पोलिसांची पाच वर्ष सुरक्षा घेतली त्या पोलिसांवरच जर संशय घेत असाल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडून जावं’ असा सणसणीत टोला परब यांनी लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली होती. तसेच मुंबई पोलीस धीम्या गतीने तपास करत असल्याचं त्यांनी म्हंटल होतं. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. "मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही आहे" असं अमृता फडणवीसांनी ट्विट करत म्हंटल होतं.AM News Developed by Kalavati Technologies