मुंबई । बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलरी शॉप लुटणारी टोळी अटकेत

मुख्य आरोपीचे विरार मध्येच ज्वेलरी शॉप असल्याचे उघड

मुंबई । बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलरी शॉपवर दरोडा टाकून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष 12 च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या टोळीला बेड्या ठोकल्यानंतर त्यांचा पुढचा प्लॅन फसला आहे. या प्रकरणात एकूण 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून यातल्या मुख्य आरोपीचे विरार मध्येच ज्वेलरी शॉप असल्याचे उघड झाले आहे.

कांदिवली परिसरातल्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या प्रमाणित ज्वेलरी शॉप वर 22 तारखेला काही आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दुकानदाराने आरडाओरडा केल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आणि आरोपी दोन मोटारसायकल वरून पळून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. ज्यामध्ये एकूण 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपींचा माग काढण्यात यश आले. ज्या दुकानात हा प्रकार घडला त्याच दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळी घटना कैद झाली आहे. या घटनेतले 4 आरोपी हे परराज्यातले असून चोरीचा कट हा ते तुरुंगात असताना सुनियोजित पद्धतीने केला होता असे उघड झाले आहे. या आरोपींवर मुंबईतल्या एन एम जोशी मार्ग, नयानगर पोलीस ठाण्यात याआधी सुद्धा गुन्हे दाखल असून सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झालं आहे. या आरोपींवर आता गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक आरोपीकडून 1 अग्निशस्त्र, 3 जिवंत काडतुसे, 2 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्यात. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies