चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी धोनीने रडवले होते बांग्लादेशला

शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असतांना धोनीने केले होते रनआऊट

स्पेशल डेस्क | अगदी चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 23 मार्च 2016 ला भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी 20 विश्वचषकात क्रिकेट प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला होता. बांग्लादेशला शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असतांना धोनीच्या चतुर कामगिरीने भारताच्या आशा टी 20 वर्ल्डकपमध्ये कायम ठेवल्या होत्या. 

भारत आणि बांगलादेश यांच्यात खूपच रोमांचक आणि काटेरी सामने पाहायला मिळतात. असाच एक अविस्मरणीय सामना 2016 च्या टी 20 विश्वचषकातील होता. अगदी चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी -२० विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारतीय प्रेक्षकांची धडधड वाढली होती. आपण सामना हरणारच या स्थितीत असतांना महेंद्रसिंग धोनीने धावबाद करत भारताला विजय मिळवून दिला होता.


धोनीने बांगलादेशला रडवले


टी 20 वर्ल्डकपचा सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 146 धावा केल्या. 147 धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाच्या विकेट्सही वारंवार पडत होत्या 19 व्या षटकात बांगलादेशने 136 धावांत 7 गडी गमावले होते. मुशफिकुर रहीम आणि महमूदुल्ला मैदानावर टिकून होते. बांगलादेशचा संघ सहज हा सामना त्यांच्या नावावर करेल असे वाटत असतांना. महेंद्रसिंग धोनीने हे होऊ दिले नाही.

शेवटच्या षटकात सामन्याचा पवित्रा बदलला. चौथ्या चेंडूवर मुशफिकुर रहीम झेलबाद झाला. त्याचवेळी पाचव्या चेंडूवर महमूदुल्लाही झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असतांना बांग्लादेशला त्या काढू दिल्या नाही. हार्दीक पांड्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू बांग्लादेशी फलंदाजाला खेळता आला नाही परिणामी चेंडू धोनीकडे येताच तो मुस्तफिजुर रहमानला बाद करण्यासाठी विकेटच्या दिशेने धावला. चित्याचा वेग दाखवत धोनीने मुस्तफिजूरला बाद केले. अशाप्रकारे, भारताने हा सामना एका धावांच्या फरकाने जिंकला.AM News Developed by Kalavati Technologies