महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल कॅमेरा आढळल्याने नागपुरात खळबळ

युवतीच्या सजगतेमुळे उघडकीस आला प्रकार


नागपूर | कपडाच्या दुकानात महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल कॅमेरा लावून रूम मधील दृश्य रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरात समोर आला आहे. महाविद्यालयीन तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुकानाचा मालक व एका कर्मचाऱ्यास अटक केली आहे. या प्रकारामुळे दुकानातील चेंजिंग रूम मधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महिलांनो जर तुम्ही कपड्यांच्या दुकानात, मॉल किंवा शोरूम मध्ये कपडे खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. कपडे पसंत केल्यानंतर ते घालून पाहण्यासाठी तुम्ही वापर करत असलेल्या चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा किंवा मोबाईल तर नाही ना याची खात्री करून घ्या. कारण कॅमेरा किंवा मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊन ते व्हायरल होऊ शकते. नागपूरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या सीताबर्डी भागातील फ्रेंड्स या नामांकित कपड्यांच्या शोरूममधील चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेऊन रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन तरुणी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना अचानक मोबाईल सारखा व्हायब्रेट होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शोध घेतला असता एका पिशवीत मोबाईल लपवून ठेवल्याचा त्यांना दिसलं. मोबाईल सुरू असून त्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत तरुणींनी दुकानाच्या मालकाला याबाबत सांगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर युवतींनी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलिसांत तक्रार दिली आहे.

सुरवातीला या प्रकरणाची व्याप्ती कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांनींनी मोबाईलमधील रेकॉर्डिंग पोलिसांनी तपासले. तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य समजून थेट फ्रेंड्स कपड्याचे दुकान गाठले. पोलिसांनी या प्रकरणात दुकानाचा मालक किसन अग्रवाल आणि नोकर निखिल चौथमल या दोघांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी दुकानातील चेंजिंग रूममध्ये लावलेला मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये आणखी अशाप्रकारच्या काही क्लिप्स आहेत का याचा तपास करीत आहेत. सध्यातरी त्याप्रकारच्या व्हिडीओ क्लिप्स मिळाल्या नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आता शोरूम व दुकानातील चेंजिंग रूम तपासणीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. हे पथक शो रूम्स, मॉल, कपड्यांची दुकानातील चेंजिंग रूममध्ये आकस्मिक भेट देऊन त्यांची तपासणी करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात त्या विद्यार्थ्यांनींनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे आहे. ज्यामुळे विकृत वृत्तीच्या दोघांना चांगलीच अद्दल घडली.AM News Developed by Kalavati Technologies