वाढीव वीजबिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

बिलात 50 टक्के सवलत द्यावी तसेच वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा महावितरणाच्या कार्यालयाची वीज कापण्याचा मनसेचा इशारा

नवी मुंबई । वाढीव वीज बिलांविरोधात नवी मुंबईत मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेरुळ येथील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना महावितरणच्या प्रवेशद्वारावर रोखले. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावण्यात आले. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

ग्राहकांना सुधारीत विजबिले पाठवून त्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये. अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाची विज कापण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी दिला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, शहर सहसचिव अभिजित देसाई, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, विभाग अध्यक्ष विनोद पाखरे, विभाग अध्यक्ष देवा प्रसाद, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, विभाग अध्यक्ष नितीन नाईकडे, रोजगार स्वयं रोजगारचे उपशहर संघटक अनिकेत पाटील हे उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies