राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी पोरकटपणाने वागू नये - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा - हर्षवर्धन

इंदापूर । इंदापूर तालुक्यात गेली काही दिवसांपासून कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होण्याची गरज आहे. मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे गर्दीत सूरपाट्या खेळून व स्वतःचे छायाचित्र असलेले पतंग उडवून सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पोरकटपणाने वागून व स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.28) प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून रुग्णांची संख्या 150 च्या पुढे गेली आहे, मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांचेकडून शासकीय पातळीवर तालुक्यात प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात भिगवण व इतर ठिकाणी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. नागरिकांच्या ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच कोविड रुग्णासाठी व्हेंटीलेटर व उपचाराची सुविधा इंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. राज्यातील इतर मंत्री तसेच लोकप्रतिनिधी हे यासंदर्भात बैठका, दौरे काढून प्रभावी उपाययोजना करीत असताना इंदापूर तालुक्यात मात्र लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर तालुक्यात युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांची सहानुभूती मिळावी म्हणून त्यांचे बरोबर सूरफाट्या अथवा पतंग उडवणे ऐवजी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम राज्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र गेली सहा वर्षे ते युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे तालुक्यातील युवक अडचणीत सापडला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

मंत्री पदावरील व्यक्तीने बेजबाबदारपणे न वागता कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक असते, मात्र जबाबदार पदावरील व्यक्तीने कोरोनाच्या संकट काळात सूरफाट्या खेळून व पतंग उडवत पोरकटपणे वागणे हे इंदापूर तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही, असे स्पष्ट मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुक्यामध्ये दररोज कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जनतेमध्ये काळजीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे सतत काहीना स्टंटबाजीची सवय असलेल्या इंदापूरच्या राज्यमंत्र्यांनी पोरकट वागणे व प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी बंद करून, जनतेला शासकीय पातळीवर मदत करून दिलासा देण्याचे काम करावे, असा सल्लाही शेवटी प्रसिद्धीपत्रकामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies