राज्यातील पहिल्या पोस्टवूमन मालती कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या पोस्टवूमन मालती सदाशिव कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने कोल्हापूरात निधन झाले.

कोल्हापूर । भारतातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या पोस्टवूमन मालती सदाशिव कुलकर्णी (वय 72) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. महाराष्ट्रामध्ये 1983 पर्यंत पुरुषच पोस्टमन म्हणून काम करीत होते. मालती कुलकर्णी या शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे ब्रँच पोस्टमास्तर म्हणून काम करीत होत्या. 1982 साली त्यांनी खात्याअंतर्गत पोस्टमन पदासाठी परीक्षा दिली. लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 15 नोव्हेंबर 1983 रोजी महाराष्ट्रातील पहिल्या पोस्टवूमन म्हणून कोल्हापूरातील सिटी पोस्ट कार्यालयात रुजू झाल्या.

त्याकाळी महिलांनी पोस्टमन म्हणून काम करणे सोपे नव्हते. कारण बहुतांशी संपर्क माध्यम पोस्टच होते. त्यामुळे ऊन, वारे, पावसातही त्यांनी घरच्यांच्या पाठबळावर ही सेवा चांगल्या पध्दतीने दिली होती. 29 फेब्रुवारी 2008 रोजी स्टँम्प व्हेंडर म्हणून त्या निवृत्त झाल्या. ठाणे येथील पोस्ट खात्याच्या अधिवेशनामध्ये त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. मालती कुलकर्णी यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. खेड तालुक्यातील लवेल येथील विश्वनाथ विद्यालयातील इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक वामन कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा दुसरा मुलगा प्रदीप हा प्रसिध्द तबलावादक आहे.AM News Developed by Kalavati Technologies