CAA-NRCच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंद, 35 संघटनांचा सहभाग

वंचितच्या बंदला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई/नागपूर  । केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या(एनआरसी) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. वंचितच्या या बंदला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचितच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

सीएएला विरोध करत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारला जबाबदार ठरवून टीका केली आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असून देशभरात भावनेचे राजकारण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शाह मांडत असून हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

तथापि, राज्यव्यापी बंददरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज झाले आहेत. दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी होण्यासाठी वंचितसह अन्य संघटनांकडून जनजागरण बैठका घेण्यात आल्या. तसेच बंददरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. या राज्यव्यापी बंदला एमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघासह अन्य संघटनांचा पाठिंबा जाहीर झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies