जेएसडब्लू स्टील कंपनीतून धुराचे लोट; कंपनी परिसरात पाच किलोमीटर पर्यंत धुरच धूर..

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कोक प्लांट शटडाउन झाल्याने धुराचे लोट; कंपनीचे स्पष्टीकरण

पेण । पेण तालुक्यातील वडखळ डोळवी परिसरात असणाऱ्या जेएसडब्लू स्टील कंपनी मधून येणाऱ्या धुराच्या लोटामुळे येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनी परिसरात पाच किलोमीटर अंतरावर हे धुराचे लोट गेले असून नक्की हे धुराचे लोट आहेत की काही गळती झाली आहे. याबाबत नागरिकांसह स्थानिक प्रशासन देखील संभ्रमात पडले होते. या आधीच कोरोनाची दहशत असताना आता हे धुराचे लोट गावा-गावात पसरले आहे.

ज्यांना श्वसनाचे किंवा हृदयविकाराचे आजार आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये आजारी व्यक्ती, वृद्ध किंवा लहान मुले आहेत त्यामुळे त्यांना इतर आजार जडण्याच्या भीतीने सोशल मीडियावर जेएसडब्लू स्टील कंपनीमधील या धुराच्या लोटांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. मात्र पेण तालुक्यात गणपती कारखाने मोठया प्रमाणात आहेत आणि पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत बंदी घातली आहे, मग या अशा प्रकारच्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर काय कारवाई केली जाणार असा सवाल देखील सोशल मीडियाद्वारे विचारलं जात आहे.

तर येथील अनेक स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रांत कार्यालयाला पत्र लिहुन कंपनीला जाब विचारून कारवाईची मागणी देखील केली आहे. दरम्यान जेएसडब्लू कंपनी प्रशासनाने कंपनीत जे कोक युनिट आहे, त्या युनिटमध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रिप झाली. त्या दरम्यान सदर प्लांट शटडाउन झाला आणि कोक प्रक्रिया बंद पडल्याने हा धूर बाहेर पडला, मात्र हा धूर विषारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies