कोल्हापुरात महापूर, एनडीआरएफसह लष्कराचे पथक दाखल, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवणार

गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टिंगसाठी आज कोल्हापुरात दाखल होणार.

कोल्हापूर । पंचगंगेने 52 फुटांपर्यंतची पातळी ओलांडल्याने शहरासह जिल्ह्यात महापुराची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. पावसाचा जोर सुरूच असून धरणातून विसर्गही सुरू असल्याने परिस्थिती अतिशय गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये एनडीआरएफसह लष्कराचे पथक दाखल झाले आहे. 106 जणांचे हे पथक कोल्हापूरजवळ पोहोचले आहे.

जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात स्थलांतरास सुरुवात होणार आहे. खराब वातावरणामुळे नेव्हीचे विमान कोल्हापूरमध्ये पोहोचू शकले नाही. गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टिंगसाठी आज कोल्हापूरमध्ये दाखल होईल. महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही पथकांना पुढे कोल्हापूरात पोहोचता आले नाही. सध्या बोट तयार करून हे पथक कोल्हापूरकडे बचाव कार्यासाठी थोड्याच वेळात रवाना होत आहे.

पश्चिम घाटमाथ्यावरती प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. यामुळे पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला आहे. नद्यांचे पाणी ग्रामीण भागात नागरी वस्तीत घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आरे, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील नृरसिंहवाडी, खिद्रापूर, टाकवडे ही गावे पूर्णतः रिकामी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या गावातील नागरिकांसह जनावरांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर शहरातील ओढ्याकाठी असलेल्या घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस, रमणमळा, नागाळा पार्क केव्हिज पार्क, व्हीनस कॉर्नर, बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत इत्यादी परिसरामध्ये अडकून पडलेल्या लोकांना जिल्हा प्रशासन महापालिका अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी पूरस्थितीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies