केडीएमसी खरेदी करणार 10 हजार अँटीजन टेस्ट किट

या टेस्टद्वारे फक्त 30 ते 45 मिनिटांच्या आत कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याचे निदान होऊ शकते.

ठाणे | कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील हायरिस्क कोराना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तातडीने टेस्ट करण्याकरीता अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे 10 हजार टेस्ट किट केडीएमसीकडून पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही टेस्ट माफक दरात केली जाणार आहे.

केडीएमसी क्षेत्रात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पालिकेकडून उपाययोजना म्हणून 10 हजार अँटीजन टेस्ट कीटची ऑर्डर केली असून लवकरच पालिकेकडे हे किट उपलब्ध होणार आहे. या टेस्टद्वारे फक्त 30 ते 45 मिनिटांच्या आत कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याचे निदान होऊ शकते. तसेच या टेस्टच्या उपयोग महापालिकेतील हायरिस्क कोरोना हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनमधील ताप सदृश्य लक्षणे असलेले व हायरिस्क व्यक्तिंच्या संपर्कात लक्षणे नसलेल्या ह्रदयविकार, यकृत, फुफूस, मूत्रपिंड, मधूमेह, रक्तदाब इत्यादी विकार असलेल्या रुग्णांसह ज्या कॅन्सर रुग्णांवर केमोथेरपीद्वारे उपचार सुरु आहे अशांना होणार आहे. एचआयव्ही बाधित अवयव प्रत्यारोपण, वृद्ध, गरोदर महिलांची टेस्ट करता येईल. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील. अँटीजन टेस्टला आयसीएमआरने मान्यता दिली आहे.

या किटचे वैशिष्ट्य म्हणजे या किटद्वारे फक्त 30 ते 45 मिनिटांच्या आत कोरोनाचे निदान स्पष्ट होणार आहे. तसेच या मशीन द्वारे पॉझिटिव्ह म्हणजे कोरोनाची बाधा नाही आणि निगेटिव्ह म्हणजे कोरोनाबाधित असे निदान होते. तसेच या किटद्वारे करण्यात येणारी टेस्ट ही देखील माफक दरात असणार असल्याचे केडीएमसी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

अँटीजन टेस्टला आयसीएमआरने मान्यता दिली असली तरी या टेस्टसाठी लागणारे किट पुरवठा करणारी कंपनी एकच आहे. प्रत्येक महापालिकेने हे कीट खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागातून दिले गेले आहेत. केडीएमसी हद्दीत आज मितीस कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 हजार इतपत आहे. दिवसाला सरासरी कोरोनाचे नवे 200 रुग्ण आढळून येत आहे. हा आकडा 400 च्या घरात जाऊन पोहचला आहे. महापालिकेकडून कोरोनाच्या चाचण्या केल्या जातात. त्याचे अहवाल मुंबईतील रुग्णालयाकडून येण्यास विलंब होतो. त्यामुळे हे किट पालिका प्रशासन आणि नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies