खबरदार...! यापुढे रुग्णांना उपचाराविना पाठवाल तर कठोर कारवाई करू, केडीएमसी आयुक्तांचा खासगी रुग्णालयांना सज्जड दम

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नसून आधी कोरोना टेस्ट रिपोर्ट मागत आहेत.

कल्याण | यापुढे एकही रुग्ण उपचाराविना परत पाठवला गेला, तर कठोर कारवाई करू, असा सज्जड दम केडीएमसी आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना दिला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी रुग्णालय रुग्णांवर उपचार करत नसून आधी कोरोना टेस्ट रिपोर्ट मागत आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कडक भूमिका घेतली आहे. केडीएमसी परिक्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती देण्यासाठी केडीएमसीच्या महापौर विनिता राणे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. मागील काळात काही गर्भवती महिलांना देखील प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला खासगी हॉस्पिटल्सनी नकार दिला होता. खासगी हॉस्पिटल्सकडून रुग्णांना दिल्या जात असलेल्या या वर्तणुकीबाबत केडीएमसी आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यापुढे प्रत्येक अगदी छोट्याशा क्लिनिकपासून ते मोठ्या हॉस्पिटलपर्यंत कुठेही साध्या तापाचा रुग्ण आला, तरी त्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाला देणं बंधनकारक असणार असल्याचं आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

मध्यंतरी रुग्णवाहिका नसल्यानं काही रुग्णांचे हाल झाल्याची बाबही आयुक्तांनी मान्य करत यापुढे केडीएमटीच्या मिनीबसेस रुग्णवाहिका म्हणून वापरण्यात येणार असल्याचं सांगितलं. प्रत्येक प्रभागात 10 रुग्णवाहिका यापुढे तैनात असतील, शिवाय त्यांना जीपीएस यंत्रणाही बसवलेली असेल, जेणेकरून रुग्णवाहिकांमध्ये समन्वय साधता येऊ शकेल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसंच धारावीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि परिसरात दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आणि झोपडपट्ट्या याठिकाणी महापालिकेनं १ मे पासून आरोग्य तपासणी सुरू केली असून आत्तापर्यंत तब्बल ८ लाख नागरिकांची तपासणी करून संशयितांना वेगळं काढण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर मुंबईहून शहरात परतणाऱ्या नोकरदारांची तपासणी केली जात असून त्यांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या देण्यात येत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

आत्तापर्यंत महापालिकेचं शास्त्रीनगर तसंच निऑन, आर आर आणि होली क्रॉस ही खासगी हॉस्पिटल कोव्हीड स्पेशल म्हणून कार्यरत असून रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा पाहता महापालिकेनं आणखी काही खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय महापालिकेची सभागृहे कोव्हीड केअर सेंटर म्हणून वापरता येतील का? या दृष्टीनेही विचार सुरू असल्याचं केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies