मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष, घोडेबाजाराच्या भितीने भाजपने अर्ध्यारात्री दिल्लीत हलवले आमदार

सिंधियांसोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला

नवी दिल्ली | देशात एकीकडे होळी साजरी होत होती मात्र त्याच वेळी मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिला आणि मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार हे धोक्यात आले. सिंधियांसोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. आता मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. याच काळात ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. याच वेळी आमदारांच्या पळवा पळवीच्या भितीने भाजपने अर्ध्या रात्री आपले आमदार दिल्लीला हलवले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. हेच ज्योतिरादित्य सिंधिया एकेकाळी राहुल गांधींचे निकवर्तीय होते. त्यांच्या राजीनाम्याने पक्षाला धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात गेल्या वर्षी झालेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ते काही काळापासून पक्षावर नाराज होते. ती नाराजी त्यांनी राजीनाम्याच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आधी सिंधिया यांनी अमित शाह यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर त्यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. ते तात्काळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता होती. मात्र अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. ते आज संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजतीय जनता पार्टीकडून राज्यसभेत पाठवले जाऊ शकते असे बोलले जात आहे. तसेच त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जागा मिळू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकारवर संकट ओढावले आहे. मात्र तरीही कमलनाथ यांनी आमच्याकडे बहुमत आहे असा दावा केला आहे. दरम्यान जे उरलेले काँग्रेसचे आमदार आहे त्यांना काँग्रेसने आता जयपुरला आणले आहे. आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता विधानसभेत बहुमताचा आकडा कमी होत 104 वर आला आहे. 22 राजीनाम्यानंतर आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या 144 वरुन 92 वर आली आहे.दरम्यान मंगळवारी संध्याकाळी कमलनाथ यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे 92 ऐवजी 88 आमदारच पोहोचले. मात्र आता सपा-बसपा आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसजवळ 99 आमदारांचा पाठिंबा आहे.

आता विधानसभेत एकूण संध्या : 206
बहुमताचा आकडा : 104
काँग्रेसचा आकडा : 99
भाजपचा आकडा : 107AM News Developed by Kalavati Technologies