25 जून 1983... हाच तो ऐतिहासिक दिवस; जेव्हा भारतीय संघानं पटकावलं होतं विश्वविजेते पद

आज त्या ऐतिहासिक दिवसाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई | 25 जून 1983... हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कपचं विजेतेपद पटाकवलं होतं. आज त्या ऐतिहासिक दिवसाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्लंडमध्ये असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा ऐतिहासिक सामना रंगला होता. भारतानं कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करत विजेतेपदाचा मान पटकावला होता.

1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली ज्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमीं बेभान होऊन नाचायला लागले. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या टीमला मोठा धक्का बसला होता. स्पर्धेत अतिशय कमजोर मानला जाणारा भारतीय संघ हा जगजेता ठरेल याचा कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने कृष्णमचारी श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटीलच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर विंडिजपुढे 183 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्यावेळी हे टार्गेट विंडिजची टीम सहज पार करेल अशीच अपेक्षा सर्वांना होती. पण जिद्दीने खेळ करण्यावर अधिकाधिक भर देणाऱ्या भारतीय संघाने सुरूवातीलाच जो धक्का दिला त्यातून कॅरेबियन टीम अखेरपर्यंत सावरली नाही.

बलविंदर सिंग संधू हे त्याकाळचे नामांकित भारतीय फास्ट बॉलर... पण इतर आंतरराष्ट्रीय बॉलर्सच्या तुलनेने फारसे प्रभावी नाही. मात्र संधू यांनी टाकलेल्या इनस्विंगवर बॉलवर वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ग्रीनिज यांचा त्रिफळा उडाला आणि मैदानात एकच जल्लोष साजरा झाला. त्यानंतर आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सर विवियन रिचर्डसनचा अडथळा दूर केला तो कॅप्टन कपिल देव यांनीच. 28 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी करणाऱ्या रिचर्डसचा अप्रतिम कॅच कपिल देव यांनी मदनलाल यांच्या बॉलिंगवर स्क्वेअर लेगला घेतला आणि आपण विजेतेपद मिळवू शकतो यांवर भारतीय टीमसह फॅन्सचाही विश्वास पक्का झाला.

भारताच्या अचूक बॉलिंगपुढे कॅरेबियन बॅटिंग लाईनअप क्षणाक्षणाला ढेपाळत गेली. अखेर अमरनाथ यांनी मायकल होल्डींगला एलबीडब्ल्यू करत विंडिजच्या इनिंगला अखेरचा खिळा ठोकला. आणि भारताच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर कपिल देव यांनी वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली आणि कोट्यवधी भारतीय फॅन्सचा उर भरून आला. धोनी ब्रिगेडनं वानखेडेवर झालेल्या 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत तब्बल 28 वर्षांनी दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाला गवासणी घातली होती.AM News Developed by Kalavati Technologies