मुंबई मनपाचा मोठा निर्णय, नाट्यगृहात आता जॅमर बसवण्यात येणार

महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे अभिनेते सुबोध भावे व सुमित राघवन यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

मुंबई | नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षक मोबाईलचा वापर करत असतात. मध्येच फोन वाजल्यामुळे प्रयोगात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी अनेक कलाकारांकडून करण्यात येतात. सुबोध भावे, सुमीत राघवन, विक्रम गोखले यांसारख्या अनेक नाट्यकलावंतांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाट्यगृहांमध्ये मोबाईल फोनचा वापर टाळण्यासाठी जॅमर बसवण्यात यावे अशी मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. ही मागणी मुंबई महापालिका प्रशासनाने मान्य केली आहे. आता महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेकडून बसवण्यात येणाऱ्या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी व शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबतच ही जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील. असे मनपा प्रशासाने म्हटले आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे अभिनेते सुबोध भावे व सुमित राघवन यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies