"गोळ्या घातल्या तरी चालेल, पण घराबाहेर पडू देणार नाही", मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू - मराठा क्रांती मोर्चा

पुणे | मराठा आंदोलनातील 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मार्गी लावावे नाहीतर वर्षा समोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. समस्त मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने 2018 मध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये 42 बांधवांचे प्राण गेले होते. म्हणून त्या 42 मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावी, "आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू. त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे.

‘बैठक चर्चा नको, मागण्या मान्य करा’

मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आता बैठक चर्चा नको, मागण्या मान्य करा, अशी थेट भूमिका घेती आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बैठकीला बोलावलं. मात्र आम्ही कोणीही या बैठकीला जाणार नाही. मागण्या मान्य न केल्यास 9 ऑगस्टला क्रांती दिनी थेट आंदोलन केलं जाईल. अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करु. ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे. समाजातील काही लोकांना हाताशी धरुन समाजाच्या मतासाठी वापर होतो आहे.”

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना यांना राम मंदिर भूमिपूजनाचं पडलं आहे. यांचा एकही मंत्री रस्त्यावर फिरु देणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी शिवस्मारक भूमिपूजन केलं. मात्र हे काम अगोदर करा, असं या आंदोलकांनी म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies