अमिताभ बच्चन यांचा 'आरे'मधील मेट्रोला पाठिंबा, ट्विट करत आंदोलकांना सुनावले

या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मेट्रो प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.

मुंबई | सध्या मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडवरुन वाद उफाळून आला आहे. अनेक मुंबईकरांकडून या प्रकल्पाचा विरोध करण्यात येतोय. मात्र बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी एक ट्विट करत आपले मत व्यक्त केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मेट्रो प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत मुंबई मेट्रो सेवेचं कौतुक केले आहे. ते म्हणाले की, मेट्रो सेवा अधिक कार्यक्षण आणि सोयीस्कर आहे. दरम्यान त्यांनी ट्विट करत एका मित्राचं उदाहरणही दिलं आहे. मेडिकल इमर्जन्सीवेळी मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला. परतल्यानंतर त्याने मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचे सांगितलं. खासगी वाहनापेक्षा मेट्रो सुविधा अधिक कार्यक्षम असल्याचे मित्राने सांगितल्याचे अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे त्यांनी या प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत लिहिलं की, अधिकाधिक झाडे लावा, हाच प्रदूषणावर उपाय आहे. मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत. तुम्ही हे केलंत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies