आयपीएलची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय, BCCI च्या अडचणीत वाढ

बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार

मुंबई | इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलच्या 13 व्या हंगामाला युएईमध्ये सुरुवात होणार आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर खेळवण्याची घोषणा केली होती. स्पर्धेसाठी मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णयही गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे बीसीसीआयने चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा असा दबाव सोशल मीडियातून वाढत होता. यानंतर VIVO कंपनीने तेराव्या हंगामातून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. ज्यानंतर भारतात चिनी वस्तूंविरोधातलं वातावरण निर्माण झालं. चिनी कंपनीसोबतचा करार न मोडल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयला टीकेची झोड सहन करावी लागत होती. बीसीसीआयनेही चिनी कंपनीची स्पॉन्सरशीप सोडावी यासाठी दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने VIVO सोबतचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे टाकत हा निर्णय घेतल्याचं कळतंय. कंपनीसोबत झालेला करार, ओनरशीप पॅटर्न यांचा अभ्यास करुन कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे.

VIVO आणि BCCI यांच्यात 5 वर्षांसाठी 2 हजार 199 कोटींचा करार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार VIVO या हंगामासाठी स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पुढील हंगामात VIVO कंपनी पुन्हा स्पॉन्सरशीप देणार असून 2023 पर्यंत हा करार कायम राहणार आहे. प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून 440 कोटींचा निधी मिळतो.AM News Developed by Kalavati Technologies