कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली

पंढरपूर | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेवून त्यांचे तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार भारत भालके, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ. पुष्पा अग्रवाल, आयएमएचे डॉ.पंकज गायकवाड, डॉ.देशमुख आदी उपस्थित होते.

कोरोना आढाव्याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोविड हॉस्पिटल सुरु करावीत कोरोनावर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी करावी.तसेच नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरिक्षकांनी शासन निर्णयानुसार दर आकारण्यात आले आहेत का याबाबत तपासणी करावी. कोरोना बाधित तसेच इतर आजाराबाबत सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आयसीएमआरच्या सुचनेनुसार कोरोना बाधित रुग्णांची माहिती तात्काळ एन.एच.पी पोर्टलवर भरावी. जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने नियोजन करावे.

आमदार भारत भालके म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोनेसाठी खाजगी रुग्णालये व शासकीय रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे, उपचारा अभावी कोणताही रुग्ण वंचित राहता कामा नये. सर्व अधिकारी यांनी समन्वाने काम करावे .पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी हायफलोनेझल ऑक्सिजन यंत्रणा खरेदीकरण्यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल.

जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. खाजगी रुग्णालयात अथवा औषधाच्या दुकानात एकादा नागरिक सर्दी, ताप, खोकला आदी आजारासाठी औषध घेवून जात असेल तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनास कळवावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील केले आहे.

यावेळी कोरोना रुग्णासाठी अधिगृहित केलेल्या रुग्णालयातील रुग्णांच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हा समितीने केली. जनकल्याण, ॲपेक्स, गॅलेक्सी, गणपती, विठ्ठल आदी हॉस्पिटलची पाहणी केली, रुग्णांसाठी आवश्यक सोयी, सुविधा, कोविड वार्ड, ऑक्सिजन व्यवस्था, मनुष्यबळ, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यकती दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies