गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याची 2 किलोमीटरपर्यंत माघार, भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच

गलवान खोऱ्यातून चीनी सैन्याने जवळपास 2 किलोमीटर माघार घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते आहे.

नवी दिल्ली | गेल्या दोन महिन्यापासून भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील वादात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गलवान खोऱ्यातून चीनी सैन्याने जवळपास 2 किलोमीटर माघार घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते आहे. 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते, आता तेथून चिनी सैन्य सुमारे एक किमी अंतरावर तळ ठोकून होते. मात्र आता चीनी सैन्याने याठिकाणावरुन माघार घेतली असल्याची माहिती आहे. गलवान खोऱ्यात आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत.

चिनी सैन्याने आपले तंबू, गाड्या आणि सैनिक मागे घेण्यास सुरवात केली आहे. कॉर्प्स कमांडर लेव्हलच्या संभाषणात हा निर्णय घेण्यात आला. सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी लोक सुमारे एक किमी अंतरावर मागे गेले आहेत. मात्र जरी चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अंत्यत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. यापूर्वी कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत जे ठरले होते, तो शब्द चीनने फिरवला होता. त्यामुळे 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये भारतीय सेनेचे 20 जवान शहीद झाले होते तर यामध्ये चीनला सुद्धा मोठे नुकसान झाले होते. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

चीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य आहे. हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. चीनच्या दबावाच्याखेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनाती केली आहे. गलवानमध्ये चीनच्या कुठल्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारताने टी-90 भीष्ण रणगाडेही तयार ठेवले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies