डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितले तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे.

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान काही ठिकाणी डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जा असे सांगण्यात आले आहे. अनेकांनी अशा तक्रारी केल्या आहेत. माणुसकी म्हणून हे अत्यंत चुकीचे आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. असे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासन घेत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

अशी वागणूक दिली जाणे हे पूर्णतः चुकीचे आहे. असे केल्यास संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असतील. असे जर निदर्शनास आले तर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने कळवले आहे. भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



AM News Developed by Kalavati Technologies