मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र कोण खोटं बोलतय हे जनतेला माहित - उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं ठाकरे घराणं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे

मुंबई । अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं, या मुख्यमत्री तसेच भाजपाच्या इतर नेत्यांच्या दाव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं ठाकरे घराणं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आमचा ठाकरीबाणाही जनतेला माहित आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटं ठरवलं जात आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटं कोण आणि खरं कोण हे सर्वांना माहित आहे. शहा आणि कंपनीच खोटारडी असून अशा लोकांसोबत राह्यचं नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं वस्त्रहरण केलं.

इतकंच नाही तर मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे तरीही ते मला खोटं ठरवत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.AM News Developed by Kalavati Technologies