'महात्मा गांधींनी आत्महत्या कशी केली,' शालेय परीक्षेत विचित्र प्रश्न शिक्षण अधिकारी अडचणीत

प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह असून, या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे

गुजरात । गुजरातमधील शालेय परीक्षेत 'महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली,' असा विचित्र प्रश्न विचारण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर गुजरातमधील शैक्षणिक प्रशासनाला धक्का बसला असून, या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मात्र, शालेय परीक्षेत दारूच्या चोरट्या वाहतुकीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला आहे. या विचित्र प्रश्नांमुळे शिक्षण अधिकारी अडचणीत आले आहेत.

'गांधीजीये आपघात करवा माटे शु करयू?' (गांधीजींनी आत्महत्या कशी केली) असा प्रश्न गुजरातमधील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. 'सुफलाम शाला विकास संकुल' संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळेत हा प्रकार घडला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गांधीनगरमध्ये या संस्थेच्या काही शाळा खासगी आहेत, तर काही शाळांना सरकारी अनुदान मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.

याशिवाय बारावीच्या परीक्षेत 'तुमच्या भागात दारूची विक्री आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा त्रास वाढल्याबद्दल तक्रार करणारे पत्र जिल्हा पोलीस प्रमुखांना लिहा,' असा प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. शनिवारी झालेल्या अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विद्यार्थ्यांना हे प्रश्न देण्यात आले होते. हे प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह असून, या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. अहवाल आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल, असे गांधीनगर जिल्हा शिक्षणाधिकारी भारत वढेर यांनी सांगितले. 'सुफलाम विकास संकुल' संस्थेच्या व्यवस्थापनाने या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. राज्याच्या शिक्षण विभागाशी त्याचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.AM News Developed by Kalavati Technologies