बेघर लोकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था, नागपूर महापालिकेचा पुढाकार 

राहण्याची व जेवणाची सोय महापालिकेने सामाजिक संस्थांच्या मदतीने केली आहे.

नागपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातच एक मोठी संख्या आहे ती म्हणजे रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांची. या बेघर लोकांसाठी नागपूर महानगर पालिका पुढे आली आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय महापालिकेने सामाजिक संस्थांच्या मदतीने केली आहे.

लॉकडाउननंतर हाल होणाऱ्यांमध्ये रस्त्यावर भीक मागून किंवा जे मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहे. अशात या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला. नागपूर महानगरपालिकेचा समाजकल्याण विभाग  आणि दीनदयाल अंत्योदय योजना अभियानांतर्गत ‘लॉकडाउन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शहरात असलेल्या पाचही बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही या बेघर निवाऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांना नेऊन लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर अर्थात शहरी बेघर निवाऱ्यातील लाभार्थी हे त्यातलेच एक होय. नागपूर शहरात महापालिकेचे पाच बेघर निवारा आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे राहणाऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी शासनाच्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाचही निवाऱ्यांमधील लाभार्थ्यांना निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती दिली जात आहे. मास्कविषयी माहिती देऊन मास्कही उपलब्ध करून दिले जात आहे.

वृद्ध बेघरांसोबतच सर्व बेघर लाभार्थ्यांना मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. भोजनसमयी तीन फुटाचे अंतर ठेवून बसविण्यात येत आहे. त्यांना बाहेर न निघण्याविषयी विनंती करण्यात येत आहे. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची विशेष काळजी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे. पाचही निवाऱ्यांमध्ये सुमारे 300 बेघर व्यक्ती असून कोव्हिड-19 बाबत जाणीव जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या बेघर निवाऱ्यांमध्ये भोजनाच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies