मुंबई । कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस... भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या लाखो क्रिकेट चाहत्यांना धोनीनं त्याच्या खेळातून निखळ आनंद दिलाय... क्रिकेटच्या मैदानावर धोनी असेल तर सगळं मैदान त्याच्याच नावानं गरजच असतं... पुन्हा ते कधी पाहायला मिळणार हे माहिती नाही... पण धोनीनं आजवर जे काही भारतीय क्रिकेटला दिलंय ते शब्दांत सांगणंच कठीण आहे... अगदी थोडक्यात माहीच्या करिअरला खास बनवणाऱ्या काही पैलूंवर नजर टाकुयात...
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी... भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला ध्रुवतारा असं धोनीच्या बाबतीत म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही... कारण धोनीनं क्रिकेटमध्ये अशी काही कमाल केलीय की तोही ध्रुवताऱ्यासारखा क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम चमकत राहणार आहे... धोनीनं भारतीय क्रिकेटला काय दिलं तर त्याची यादी खूप मोठी आहे... पण एकाच शब्दांत सांगायचं झाल्यासं धोनीनं भारतीय क्रिकेटला सर्वकाही दिलं असं म्हणणंही वावगं ठरणार नाही... धोनीची अनेक वैशिष्ट्ये आहेत... त्यामुळंच धोनी हा चाहत्यांसाठी खास आहे... धोनीच्या करिअरमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्याला खास बनवतात...
फिनिशर :
धोनी हा आजवरच्या क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे असं म्हणायला हरकत नाही... यापूर्वी भारतीय संघालाच काय पण जागतिक क्रिकेटला असा फिनिशर मिळाला नव्हता असं म्हटलं जातं... धोनी मैदानावर असेल तर भारतीय संघाला अगदी बिकट स्थितीतूनही तो त्याच्या फलंदाजीनं बाहेर काढू शकतो असं म्हणायला हरकत नाही... धोनीचे षटकार ही त्याची खासीयत आहे... त्यात त्यानं लगावलेले षटकार पाहिले तर तो ठरवून पाहिजे त्या चेंडूला मैदानाबाहेर तडाखून लावू शकतो असं म्हणता येईल... अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत धोनी जणू आपल्याकडे अजून भरपूर वेळ शिल्लक आहे असा आविर्भावात खेळत असतो... अगदी विजयाच्या एक चेंडूपूर्वीही तो चेंडू डिफेन्स करून पुढच्या चेंडूला षटकार खेचून तो विजय मिळवून देऊ शकतो...
विकेटकिपर :
धोनी हा विकेटकिपर म्हणूनही तेवढाच खास आहे... खरं तर विकेटकिपर म्हणून कामगिरी करतानाही तो असं काही करतो त्यातूनही तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो... धोनीनं करिअरची सुरुवात केली तेव्हा धोनीकडून काही चुका होत होत्या... पण त्यानंतर त्यानं विकेट किपिंगमध्ये अशी काही सुधारणा केली की, त्याची बरोबरी करणं अजूनही कुणाला शक्य नाही... त्याच्या काही ट्रिक्स तर अशा आहेत की त्या कुणाला कधीही वापरणं शक्य होणार नाही... तो मागे उभा असल्यानंतर फलंदाज बाहेर निघायची शक्यतो हिम्मत करत नाही, आणि तर तो बाहेर निघाला तर त्याला बॅटला चेंडू लावण्याशिवाय पर्याय नाही... कारण तसं झालं नाही आणि चेंडू मागे धोनीच्या हातात गेला तर त्याला पर पॅव्हेलियनमध्ये परतण्याशिवाय पर्याय नाही... धोनीची नजर एवढी परफेक्ट असते की डीआरएसमध्ये धोनीनं घेतलेला निर्णय किंवा त्याचा अंदाज शक्यतो चुकूच शकत नाही... त्यामुळं गमतीनं डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टीमही म्हटलं जातं...
कॅप्टन कूल :
धोनी म्हणजे आपला कॅप्टन कूल... आता धोनी कॅप्टन नाही असं अनेकजण म्हणतील... पण त्यानं काय होतंय... धोनी हा कायम सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी कायम कॅप्टन कूलच असेल... आजही तो जेव्हा मैदानावर असेल तेव्हा कर्णधार कोणीही असला तरी सगळ्यांच्या नजरा माहीवरच असतात... अगदी जो अधिकृत कर्णधार आहे तोही धोनीचे सल्ले घेताना दिसतो... धोनीही कधीतरी अचानक कर्णधारासारखा वागायला लागतो... हेही आपण पाहिलंय... त्यात कर्णधार म्हणून धोनीनं भारताला क्रिकेटमध्ये ते सर्वकाही मिळवून दिलंय जे भारताला मिळवायचं होतं... मग टी 20 विश्वचषक असेल 50 षटकांचा विश्वचषक असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा कसोटीतील सर्वोच्च स्थान असेल... सर्वच बाजुंनी धोनीनं क्रिकेट चाहत्यांवर आनंदाचा वर्षाव केलाय...
अशा आपल्या सर्वांच्या माहीचा आज वाढदिवस... सोशल मीडियावर धोनीचे चाहते त्याचा वाढदिवस अगदी जोमात साजरा करत आहेत... पण धोनी मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणं अगदी कूल राहून कुठतरी शांततेत मुलीबरोबर जीवनाचा आनंद घेत असेल... कारण त्याच्या खेळातूनही त्यानं कायम सर्वांनाच केवळ आनंदत दिलाय...
धोनी पुन्हा भारती संघात येणार का? धोनी निवृत्त कधी घेणार? धोनीच्या फॉर्मचं काय? असे प्रश्न इतर सगळ्यांना विचारत राहू द्या... आपल्यासारख्या धोनीच्या फॅन्सनं केवळ त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं दिलेल्या आनंदाच्या आठवणींना उजाळा द्यायचाय...