कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सरकार अपयशी; महाविकासआघाडीत समन्वय नाही - बबनराव लोणीकर

55 हजार पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्र सरकारचं अपयश असल्याचा केला घणाघात

जालना | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही, तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही, सरकार अपयशी ठरले असून राज्यकर्ते स्वतःची जबाबदारी झटकून एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघात माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यावा यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्र सरकारने किती निधी खर्च केला असा प्रश्नदेखील त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 104 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारला दिला असून वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्र राज्याला 78 हजार 500 कोटी रुपये मिळणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्याचबरोबर कर्ज स्वरूपात महाराष्ट्राला 1 लाख 65 हजार कोटी रुपये केंद्र सरकार च्या संमतीने मिळू शकतात अशी एकूण दोन लाख 71 हजार 604 कोटी रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली व होणार आहे. मात्र तरीही राज्य सरकार केंद्र शासनाला दोष देण्यात धन्यता मानत असून ही बाब योग्य नाही, किमान जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगावी अशा प्रकारची टीका आमदार लोणीकर यांनी यावेळी केली. पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले की

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडून राज्य सरकारला काय व किती प्रमाणात देण्यात आले या संदर्भातील विश्लेषण केले आहे. प्रत्यक्षात प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या माध्यमातून तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. त्यात 1750 कोटी रूपये (गहू), 2620 कोटी रूपये (तांदूळ), 100 कोटी रूपये (डाळ) तर स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये असे एकूण 4592 कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले असल्याचं लोणीकरांनी म्हंटल आहे.


तसेच महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विनसाठी 47 लाख 20 हजार, 41 अशासकीय प्रयोगशाळा तर 31 खाजगी प्रयोग शाळांना मान्यता देण्यात आली, 9.88 लाख पीपीई किट्स केंद्र शासनामार्फत राज्य शासनाला पुरवण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर 15.59 लाख एन 95 मास्क केंद्र सरकारने दिले आहेत आरोग्यासाठी मदत म्हणून 468 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे अशी माहिती देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी दिली

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिघांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असून या तिघांमध्ये समन्वय दिसून येत नसल्याचं लोणीकरांनी म्हंटल आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खुद्द राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे कोरोना पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत निंदनीय असून समन्वय नसल्याने आपसातील आत्मक्लेष विरोधी पक्ष व केंद्र सरकारवर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न हे तिन्ही पक्ष करत असल्याचा घणाघात देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी केला.AM News Developed by Kalavati Technologies