परप्रांतीयांच्या जागी स्थानिकांना नोकऱ्या द्या, अन्यथा आंदोलन छेडू, हिंदुस्थान माथाडी व जनरल कामगार सेनेचा इशारा

कमी रोजंदारीवर परप्रांतीय मजूर उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार स्थानिकांच्या हाताला रोजगार देत नव्हते.


इंदापूर (देवा राखुंडे) सध्या कोरोनाच्या महामारीमुळे औद्योगिक वसाहती ओस पडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध औद्योगिक क्षेत्रात बिहार, उत्तरप्रदेश,कर्नाटक, तेलंगना सारख्या विविध राज्यातील विविध कामगार कामानिमित्त वास्तव्यास होते. तुटपुंच्या रोजंदारीवर हे मजूर उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार स्थानिकांच्या हाताला रोजगार देत नव्हते. आता मात्र हिंदुस्थान माथाडी व जनरल कामगार सेना हे खपवून घेणार नाही. तर परप्रांतीयांच्या जागी स्थानिकांना नोकरी द्या अन्यथा आंदोलन छेडू असा कडकडीत लेखी इशारा इंदापूर औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांना दिला आहे.

शिवसेना प्रणीत हिंदुस्थान माथाडी व जनरल कामगार सेनेचे इंदापूर तालुका सरचिटणीस दुर्वास शेवाळे यांनी याबाबत बुधवार दि.२७ मे रोजी इंदापूर औद्योगिक वसाहत मधील वाँल माउंट,स्प्रे टेक, टॉवेल आदी कंपन्यांना लेखी निवेदन दिले असून यावेळी इंदापूर शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी उपस्थित होते.

या लेखी निवेदनात म्हटले आहे कि, शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये कोराना विषाणुजन्य रोगामुळे जे परप्रांतीय कामगार उद्योग धंदे सोडून गावी निघून गेले आहेत, त्यामुळे कंपनीमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण होणार आहे. जर आपण आम्हाला लवकर कळविले तर आम्ही तुम्हाला हिंदुस्थान माथाडी व जनरल कामगार सेनेच्या वतीने तालुक्यातील बेरोजगार लोकांना आम्ही काम मिळवून देण्यात मदत करू. तसेच तुमच्या कंपनीला तुमच्या व्यकंशीप्रमाणे आपणाला कामगार मिळून जातील. मंगळवार दि.२६ मे रोजी रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जास्तीत जास्त स्थानिक लोकांना काम द्यावे असे जाहिरपणे सांगितले आहे.

आपण कंपनीचे संबधीत मालक व एच आर मॅनेजर यांनी या बाबीचा विचार विनीमय करून आपल्याला कोणकोणत्या ट्रेड नुसार कोणकोणते कामगार लागणार आहेत ते आम्हाला कळवावे.जर आपण स्थानिकांना प्राधान्य न देता परप्रांतीय लोकांची भरती केली तर आम्ही माहीतीच्या अधिकाराखाली सर्व कंपनीची चौकशी करू. त्यामध्ये जर कोणी परप्रांती कामगार भेटले तर आम्ही हिंदुस्थान माथाडी कामगार सेना व शिवसेना यांच्या तर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू असा सुचक इशारा या लेखी निवेदना व्दारे इंदापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दिला आहे.

"आम्ही चार कंपन्यामध्ये बुधवार दि.२७ मे रोजी प्राथमिक भेट दिली आहे. कंपनीच्या वरिष्ट अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पूर्ण आढावा जाणून घेतला आहे. कंपन्यांना अवश्यकते नुसार वेल्डर,फिटर,टर्नर असे कुशल कामगार हवे आहेत. मात्र अर्धकुशल कामगारांना कंपन्या जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. हा हट्टीपणा कंपन्यांनी सोडून स्थानिकांना प्राधान्य देऊन आपले उद्योग धंदे चालवावेत. अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडून आम्ही कंपन्यांचे कामकाज बंद पाडू."- दुर्वास शेवाळे, तालुका सरचिटणीस शिवसेना प्रणीत हिंदुस्थान माथाडी व जनरल कामगार सेना.AM News Developed by Kalavati Technologies