जीडीपीच्या वृद्धिदरात नीचांकी घसरण, किरकोळ महागाईचा तीन वर्षांतील उच्चांक

किरकोळ महागाईच्या उच्चांकाने केंद्र सरकारच्या डोकेदुखीत भर

नवी दिल्ली । जीडीपीच्या वृद्धिदरात नीचांकी घसरण नोंदवली गेल्याने अर्थव्यवस्थेवरील संकट गहिरे होत असताना किरकोळ महागाईच्या उच्चांकाने केंद्र सरकारच्या डोकेदुखीत भर टाकली आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दराने ५.५४ टक्क्यांचा स्तर गाठला. गेल्या ३ वर्षांहून अधिक कालावधीतील ही सर्वोच्च किरकोळ महागाई ठरली आहे. फळभाज्या, डाळी व प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीचा या महागाई निर्देशांकास फटका बसला. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी ही आकडेवारी घोषित केली. नोव्हेंबरमध्ये फळभाज्यांच्या किमतीत ३६ टक्क्यांनी वाढ झाली. देशभरात गाजलेल्या कांद्याच्या भाववाढीचे प्रमाण याहून अधिक होते. डाळींच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांनी, मासे व मटणाच्या किमतीत ९.३८ टक्क्यांनी तर, कडधान्ये व अंड्यांच्या किमतीत ३.७१ टक्क्यांनी वाढ झाली. यापूर्वी जुलै २०१६मध्ये किरकोळ महागाईचा निर्देशांक ६.०७ टक्क्यांवर पोहोचला होता.

उद्दिष्टापासून दूर

किरकोळ महागाईचा दर चार टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवण्याची सूचना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला केली आहे. मात्र हे दर निर्धारित उद्दिष्टात राखण्यात आरबीआयला सलग दुसऱ्या महिन्यांत अपयश आले आहे.

उत्पादनही घटले

औद्योगिक उत्पादनातही ऑक्टोबरमध्ये ३.८ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. ऊर्जा, खाणकाम व उद्योगक्षेत्रांच्या सुमार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनास फटका बसला आहे.AM News Developed by Kalavati Technologies