गडचिरोलीत दिवसभरात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले

पॉझिटिव्ह आढळून आलेले 18 जण हे सहा तालुक्यातील आहे

गडचिरोली | जिल्हयात आज 18 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेले 18 रुग्ण सहा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. यामधील 17 गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणातील होते तर एक अहेरी येथील या पुर्वी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. यामुळे जिल्हयातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 115 झाली आहे. आतापर्यंत 59 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. सद्यस्थितीला 47 रुग्णांवर उपचार सुरू असून यातील 8 रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या 18 रुग्णांमध्ये 2 महिला व 16 पुरूष आहेत. यामध्ये अहेरी येथील एक पुरूष कोरोनाबधितांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या यादीतील आहे. तर इतर 17 रूग्णांमध्ये तामिळनाडू येथून ट्रकने आलेले 8 कामगार, ठाणे येथून आलेले 3 लोकांचे एक कुटुंब, वाशिम वरून परतलेले दोघांचे कुटुंब, हैद्राबाद येथून एकजण, अरूणाचल प्रदेश मधून आलेला बीएसएफचा एक जवान, जम्मू आणि कश्मिर येथून आलेला एक सीआरपीएफचा जवान आणि दिल्ली येथून आलेल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यांना गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या 18 व्यक्ती जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील -1, धानोरा तालुक्यातील-5, एटापल्ली मधील 3, चामोर्शी मधील -1, गडचिरोली तालुक्यातील 7 तर अहेरी तालुक्यातील -1 याप्रमाणे आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात आढळून आलेल्या 115 कोरोना रूग्णांमध्ये 26 सीआरपीएफचे जवान, 2 बीएसएफचे जवान, 43 कामगार तर इतर 44 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्हयात कोरोना संख्या एकदम एका दिवशी मोठया संख्येने वाढल्यामुळे प्रशासन अधिक काळजी घेत आहे. यामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होवू नये म्हणून अधिक सर्तक राहणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. तोंडाला मास्क किंवा रूमाल लावणे गरजेचे आहे. जिल्हयाबाहेरून आलेल्यांच्या नोंदी प्रशासनाकडे करा. तसेच स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies