कांद्याने केला सरकारचा वांधा! खासदार उदयनराजे भोसले मोदी सरकारच्या विरोधात उतरले

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह विरोधक आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी सुद्धा मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे

मुंबई । सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर मोदी सरकार विरुद्ध राज्यभर पडसाद उमटत आहे. शेतकऱ्यांसह विरोधक पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही सुद्धा त्यांच्या विरोधात उतरले आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे आता केंद्र सरकारवर आक्रमक झाले आहे. 'केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,' अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

'कांदा उत्पादक शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. देशाला अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभर कांद्याला मोठी मागणी आहे. अशा वेळी निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो. आज चांगला भाव मिळत असताना निर्यातबंदीचा निर्णय घेणे चुकीचे आहे.' हे उदयनराजे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे

'लॉकडाऊनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यामुळं सहानुभूतीपूर्वक विचार करून कांद्यावरची निर्यातबंदी उठवून शेतकरी, व्यापारी व वाहतूकदारांना दिलासा द्यावा,' अशी मागणी उदयनराजे यांनी पत्राद्वारे केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies