परतीच्या पावसाने कल्याण तालुक्यातील शेतकरी हवालदिल, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे

कल्याण । परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून कल्याण तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

दसरा-दिपावली असे सण उत्सव जवळ येत असताना शेतकऱ्यांची यंदा उजेडात होणारी दिवाळी यंदा अंधारात होणार आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तहसीलदारांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. कल्याण तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करत असून त्यांचे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे मान्य करत तहसीलदारांनी या शेतीचे पंचनामे करण्याची कारवाई तातडीने सुरु करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies