कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा! केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात दिंडोरीत शिवसेना व कांदा उत्पादकांचे आंदोलन

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे शेतकरी आणि राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात संतप्त झाले आहे

दिंडोरी । देशांतर्गत बाजारपेठात कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली असल्याच्या निषेधार्थ दिंडोरी येथील नाशिक कळवण राज्य मार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडून केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते.

सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. आधीच लॉकडाऊनच्या संकटकाळातुन शेतकरी वर्ग, सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी अन्यायकारक ठरली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तालुका शिवसेनेच्‍या वतीने केंद्र सरकारच्या निषेर्धात आंदोलन करून, केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जेष्ठ नेते सुरेश डोखळे, तालुका प्रमुख सतिश देशमुख, पांडूरंग गणोरे, सुरेश देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तालुका व शहर पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी उपस्‍थित होते.



AM News Developed by Kalavati Technologies