कृषिमंत्र्यांनी धरली चिखलवाट, बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं कृषीमंत्री दादा भुसे राज्याच्या दौऱ्यावर

चंद्रपुर । राज्यात राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं राज्याच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी चंद्रपूरच्या दौऱ्यात आज अचानक आपला ताफा थांबवून शेताकडे मोर्चा वळवला. वाटेत शेती दिसताच त्यांनी गाडी थांबवली आणि शेताची चिखलवाट धरली. काल रात्री ते चंद्रपुरात आले. मुक्काम केल्यानंतर त्यांनी सकाळी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. नंतर ते यवतमाळकडे रवाना झाले. याच मार्गावर नंदोरी नावाच्या गावाजवळ येताच रस्त्यालगत त्यांना शेती दिसली. दौऱ्याचा शिष्टाचार बाजूला ठेवत त्यांनी गाडी थांबवली. मंत्री कशासाठी थांबले, याचा सगळे विचार करीत असतानाच त्यांनी गाडीखाली उतरून शेताची वाट धरली. सोयाबीन पेरलेल्या शेतात जाऊन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडे असलेल्या खतांची पाहणी केली. अडचणी समजून घेतल्या. शिवाय खतांच्या संदर्भात काही अडचणी आल्यास थेट संपर्कासाठी त्यांनी मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिला. बांधावर थेट गेल्यानं जमिनीवरील समस्या कळतात. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि स्थिती कळते, असं भुसे यांचं म्हणणं होतं.AM News Developed by Kalavati Technologies