खळबळजनक! कोरेगाव भीमात एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाली कोरोनाची बाधा

कोरेगाव भीमा । शिरूर येथे अनेक दिवसांनंतर सहा जुलै रोजी एका युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असताना त्या रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा ता.शिरुर येथे १९ मार्चपासून ३६ दिवसांचा सर्वात मोठा लॉकडाऊन घेतल्याने पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावाला कोरोनापासुन संरक्षित ठेवण्यास कृती समितीला यापूर्वी यश आले होते. मात्र एक महिन्यापूर्वी कोरेगाव भीमात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असताना पुन्हा सहा जुलै रोजी कोरेगाव भीमात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे, सदर रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या.

मात्र सदर घटनेमुळे कोरेगाव भिमामध्ये एकाच खळबळ उडाली आणि कोरेगाव भीमा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायतच्या वतीने सदर व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणचा परिसर सील करत संपर्ण गाव चौदा दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला, तसेच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच योगेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण केले तसेच गाव कामगार तलाठी अश्विनी कोकाटे, पोलीस पाटिल मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करुन गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या.

त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्णाच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्व्याब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतलेले असताना आज त्या सात जणांचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असून सात जणांपैकी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिरूर तालुक्यामध्ये एकाच वेळी एका घरातील जास्त व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची पहिलीच घटना कोरेगाव भीमा येथे घडली असल्याने कोरेगाव भीमा सह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहे, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीची बैठक आयोजित करून खबरदारीच्या उपाययोजना बाबत चर्चा करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या वतीने सदर पाच व्यक्तींच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies