होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देणं बेतलं जीवावर; तुंबळ हाणामारीत दोघांची हत्या

याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

लातूर | एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटात माणूसकीचे दर्शन घडत असताना दुसरीकडं तेच हात जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या निलंगा तालुक्यातील बोळेगावात घडला आहे. काल मुंबईला राहणारा एक जण उत्तरप्रदेश येथून ट्रक घेऊन बोळेगावात आला असता त्यास शेतात होम क्वारंटाईन व्हावे असं सांगितल्याने वाद निर्माण झाला. नंतर या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारी होऊन दोघांची हत्या करण्यात आली. पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून बोळेगावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान बरमदे हा मुंबईला वास्तव्याला होता. तो ट्रॅक घेऊन उत्तरप्रदेश येथून आल्याची माहिती कळल्याने बोळेगावच्या अँटी कोरोना फोर्सचे शत्रुघ्न पाटील यांनी बरमदे याला ट्रक बाजूला घेऊन शेतात होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान बरमदे हा तिथून निघून गेला. आज पहाटेच्या सुमारास बरमदे याने बोळेगावात येऊन शत्रूघ्न पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत शत्रूघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील ठार झाले. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत विद्यमान बरमदे यासह आठ जणांवर कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बरमदे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies