मातोश्री!

हा देश मातोश्रींनीच घडवला... जग आणि जगणे यातील आयुष्यरेषा 'मातोश्री'शी निगडित असते.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये 'तिचे' असणे.. म्हणजे, सहज नव्हते. नातेसंबंधाने सैरभैर झालेल्या, नात्यांत गुन्हेगारी आणणाऱ्या, ज्येष्ठांचा पदोपदी अपमान करणाऱ्या नव्या जगासाठी नाते जप, हा मोलाचा संदेश देणारे होते.

कोण होती ती?

नात्यात विष घालू पाहणाऱ्या विसंवादी समाजाला दरबार हॉलमधील तिच्या हजेरीने चांगलीच चपराक दिली.

कोण होती ती?

जगाला 'सांभाळ' या आपलुकीच्या शब्दाचा थेट अर्थ पटवून देणारी तिची हजेरी होती. तिच्या तेथील हजेरीला खूप कंगोरे होते. एक सर्वमान्य दिशा होती. संस्कृती होती. जगण्याचे बळ देणारी तिची आकृतीही होती.

कोण होती ती?

ती आली, तिने डोळे भरून पाहिले, प्रत्येक क्षण डोळ्यात साठवला.. ती आतून हसली... खूप निरामय.. निरागस! तिची त्यातही उपस्थिती केवळ आई म्हणून नव्हती. केवळ स्त्रीसुद्धा नव्हती... तर देशाला मातृसंकेत आणि संदेश देणारी अशी ती होती.

कोण होती ती?

जे पाय धरून-धरूनच तो लहानाचा मोठा झाला. अगदी वटवृक्ष झाला. त्या तिच्या लेकराने तिचे पाय धरले. नमस्कार केला. दोन मिनिटे तो तिच्यापुढे उभा राहिला. त्याने तिच्या डोळ्यांतील भाव टिपले.

कोण होती ती?

हे सगळे घडत होते तेव्हा, तिथे तो एकटा नव्हता. राष्ट्रपती बघत होते.. पंतप्रधान बघत होते.. त्याच्या हालचाली सारे जग बघत होते. देश बघत होता. आपल्या मुलाचे कौतुक बघायला ती वयोवृद्ध माऊली स्ट्रेचरवरून आली होती. माय-लेकराचे असे अद्भुत नाते राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल प्रथमच पाहत होता. अचंबित... अद्भुत.. जगण्याची दिशा निश्चित करणारे. वात्सल्य आणि आयुष्य याची अमूल्य प्रेरणा देणारा तो प्रसंग होता. मायेचा हळवा स्पर्श या देशात किती जपून ठेवला जातो, ते जगाला कळावे अशीच ती कृती होती.

कोण होती ती?

ती माउली होती - सुजाता अरविंद बोबडे. वय ९२. त्यांच्या सोबतीला वृद्धापकाळ आणि आजारपण. फार बोलणे जमत नाही. जो संवाद आहे तो शक्यतो नजरेने, खुणांनी!

भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई, ही त्यांची नवी ओळख.

खरंय.. हा देश मातोश्रींनीच घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई, महात्मा फुलेंच्या चिमणाबाई, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमाबाई, महात्मा गांधीजींच्या पुतळीबाई, लोकमान्य टिळकांच्या पार्वतीबाई असोत... जग आणि जगणे यातील आयुष्यरेषा 'मातोश्री'शी निगडित असते.

इथे तर साक्षात सरन्यायाधीशाची ती आई आहे. त्यामुळेच, एका कायदेशीर गोष्टीसाठी सकारात्मक ताकद मिळते. 'सांभाळ' हा तो शब्द..! सांभाळचा समानार्थी शब्द म्हणजे मातोश्री. एकोपा आणि मायाळूपणा बाळगणारा शब्द.

कायदा करणारे आणि अंमलबजावणी कारणारे दोघेही एकाच मार्गावरून चालणारे असतील, तर 'मातोश्री' या शब्दाची झळाळी उदाहरण होते. दरबार हॉलमधील त्या क्षणांनी 'सांभाळ' या अर्थाला ताकद दिली.

केंद्र सरकार 'सांभाळ कायद्या'ची व्याप्ती वाढवण्याच्या विचारात आहे. नव्या कायद्यानुसार घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सून, जावई आणि दत्तक मुलांवरही असेल. सध्याच्या कायद्यामध्ये ही जबाबदारी केवळ मुलगा, मुलगी आणि नातवंडांवर आहे.

ज्या भारतीय संस्कृतीमध्ये घरातील ज्येष्ठांचा मान आणि त्यांची काळजी या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे तिथे 'सांभाळ' कायदा अस्तित्वात आला.

वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची मुलांवर सक्ती करणारा कायदा २००७ मध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यासाठी जिल्हा पातळीवर लवादाची स्थापना करण्यात आली. तर गावपातळीवर एका देखभाल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. इथून त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. वृद्ध आपली समस्या घेऊन वकिलांकडे गेले, तर वकील त्यांना न्यायालयात घेऊन जातात. या कायद्यात न्यायालयात जाण्याची गरज नाही. लवादामध्ये या प्रकरणाची ९० दिवसांत सुनावणी होऊन निकाल दिला जातो.

ज्येष्ठ नागरिक, पालक आणि नातेवाईक या कायद्यात येतात. स्वत:चा खर्च भागवू न शकणाऱ्या व्यक्ती आपल्या मुलांकडून देखभाल खर्च मागू शकतात. मुले नसलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या नातेवाइकांकडे देखभाल खर्च मागू शकतात. त्यांना अन्न, कपडे, घर, वैद्यकीय खर्च, उपचार यासाठी देखभाल खर्च मिळू शकतो.

दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका खटल्यात दिल्ली ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व सुविधा कायदा २००९च्या सुधारणेचे महत्त्वपूर्ण विश्‍लेषण करत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना सर्व संपत्तीतून बेदखल करता येते, असे स्पष्ट केले. ३० दिवसांत मुलगा व सून यांनी वडिलांचे घर मोकळे करावे, असा आदेश दिला.

नातेसंबंधांचे गुन्हेगारीकरण होऊ नये, यासाठी या कायद्याचे अस्तित्व आहे. पण न्याय मिळत नाही अशी स्थिती आहे. कायदाच्या अंमलबजावणीत अर्धन्यायिक व्यवस्था असल्याने त्या अधिकाऱ्यांना आधीच त्यांची कामे आहेत. त्या जोडीला आणखी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यातून मार्ग काढण्याचे काम होतेच असे नाही. त्याचे कारण, शांतपणे ऐकून घेण्यासाठी वेळ आहे कुणाकडे? जसे गाणे ऐकण्यासाठी तयार कान हवेत. तसेच, वृद्धांच्या तक्रारी ऐकून घ्यायला, त्यांचे दुःख समजून घ्यायला तशी संवेदनशील व्यक्ती हवी. ती असतेच असे नाही.

पुण्यात 'ह्युमन राइट्स' या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सल्ला केंद्र चालवणारे अॅड. रमा आणि असीम सरोदे म्हणतात,' ज्येष्ठ नागरिक आपल्याच मुलामुलींविरुद्ध तक्रार अशावेळी करतात, जेव्हा त्यांच्या समाधानाचे, चर्चेचे सर्व मार्ग बंद झाले असतात. प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा शेवटचा मार्ग आणि पर्याय तक्रारीचा असतो. कोणाला वाटत असते आपल्या आई-वडिलांशी संबंध बिघडावे किंवा मुलांशी वाद व्हावेत?

अॅड. असीम सरोदे थेट म्हणतात, स्मार्ट सिटीज केवळ रस्ते चांगले बांधून होणार नाहीत, जर ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली गेली तरच उद्देश सफल होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी जपान पॅटर्न असावा. तिथे मुलांच्या कार्यालयीन वेळेत घरातील वृद्धांना सरकारी वृद्धाश्रमात ठेवले जाते. पाल्य त्यांचे कामकाजाचे वेळापत्रक सरकारला देते. ठरलेल्या वेळी त्यांची काळजी घ्यायला सरकारी यंत्रणा राबते. दवाखाना ते भोजन सगळे ते करतात. या उपायाचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. आपल्या पालकांचा सांभाळ नीट होत असल्याने घरात आनंद राहतो. शिवाय त्या पाल्यांचे चित्त त्यांच्या कार्यालयीन कामात अधिक लागल्याने देशाची उत्पादकताही वाढते. देशसेवेचा हा आणखी वेगळा पैलू, यामागे जोडला गेला आहे.

वर्षभरापूर्वी, पंतप्रधान आपल्या बंगल्याच्या बागेत ९६ वर्षीय मातोश्री हिराबा यांना व्हीलचेअरवर फेरफटका मारताना पाहिले. त्यावरील टीकाही वाचली. ते दृश्य कुटुंबातील सारे कलह, द्वेष, मत्सर बाजूला ठेवून तमाम भारतीयांनी अनुकरण करावे असेच आहे. मोदी यांचे मातोश्रींसोबतचे छायाचित्र आईवडिलांना नाकारून पैशाच्या माजावर भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या आधुनिक श्रावणबाळांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारेच नव्हे, तर अशांचा मेंदू वठणीवर आणणारेही आहे.

तरीही, टीका होतेच. मातोश्री हिराबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मायलेकाचे गहिरे नाते सध्याच्या विस्कटणार्‍या कुटुंबव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर अनुकरणीय यासाठी म्हटले पाहिजे, जेव्हा हिराबा व मोदी यांचा फेरफटका सुरू होता, त्याचवेळी दिल्लीत एका दुसर्‍या घटनेने कुटुंब व्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या जात होत्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू (बापूजींचे चिरंजीव रामदास यांचे धाकटे चिरंजीव) कनुभाई, त्यांच्या पत्नी शिवलक्ष्मी यांच्यासह दक्षिण दिल्लीतील गौतमपुरी भागातील विश्राम वृद्धाश्रमात राहायला गेले होते. बरं, कनुभाई साधेसोपे व्यक्तित्व नक्कीच नाही. ते बापूजींचे नातू असले तरी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतून शिक्षण घेतल्यावर ते 'नासा'मध्ये संशोधक होते. त्यांच्या पत्नी बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट आहेत. विस्कटलेल्या कुटुंब व्यवस्थेचे हे दुसरे टोक गाठलेल्या या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मोदी व हिराबा यांच्या छायाचित्राने समाजाला नेमका कोणता संदेश दिला? या देशाचे पंतप्रधान आपल्या वृद्ध आईसह निव्वळ फेरफटका मारत नाहीत अथवा फोटोचा शौकही पुरा करत नाहीत. तर ते 'वृद्धांना जपा, त्यांचे व्हा..' असा संदेश देतात. राजकारणी म्हणून सोडा; पण मुलगा म्हणून मोदी इथे आदर्श ठरतात! जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला देश तरुणांचा देश आहे, हे जेव्हा ठासून सांगितले जाते, तेव्हाच जन्मदात्यांना वृद्धाश्रमातील भग्नभिंतीत ढकलू नका, हे सांगण्याचे काम मोदी व हिराबा यांच्या छायाचित्राने केले आहे. टीकाकारांना त्यातही राजकारण दिसले. मोदींनी आईसोबतचे फोटो जाहीर करायला नको होते. ती त्यांची खासगी बाब आहे. एवढेच नव्हे, तर मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांना काय वाटत असणार, अशी टर उडविली गेली. कोण एकेकाळी 'यथा राजा तथा प्रजा' असे भारताचे सूत्र होते व आरुणी, एकलव्य, ध्रुव, श्रावण बाळ, प्रल्हाद, अभिमन्यू, सिद्धार्थ, शिवबा अथवा साने गुरुजींचा श्याम अशा सुकुमारांच्या गोष्टींनी बालमनाला आच्छादलेले होते. त्याच भांडवलावर आपण 'संस्कार' नावाचा ढोल बडवीत असतो. पिढी बदलली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जन्म देणार्‍या आईवडिलांच्या देखभालीसाठी पोलिसी बळ व कायद्याचा धाक दाखवावा लागतो. आईवडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी सरकारला कायदा करावा लागतो. असा कायदा करावा लागणे याचाच अर्थ आपले संस्कार ठिसूळ झाले असा होतो. म्हणूनही मोदी मायलेकाचा फोटो कुटुंब व्यवस्थेला उभारी देणारा वाटतो.

म्हणून, विषय इथे संपत नाही...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली २०० वी टेस्ट मॅच मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला. त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आई रजनी खास आल्या होत्या. आई प्रेसिडेंट बॉक्समधून मॅच पाहणार आहे आणि तिथला रस्ता आईची व्हीलचेअर जाण्यासाठी अरुंद आहे हे लक्षात आल्यावर सचिनने वानखेडेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि तिथे रॅम्प पुरवण्याबाबत सांगितले. सचिनच्या आईने तोवर त्याची कोणतीही मॅच पाहिलेली नव्हती. हा तर भारतरत्न आहे.

म्हातार्‍या आंधळ्या आईवडिलांची सेवा करणारा श्रावणबाळ आपण ऐकला. तर मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण आईच्या पोटात गर्भरूपाने सुरू झाले असते, असे सांगणारा साने गुरुजींचा श्यामही..|!

म्हणूनच,
कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर आरूढ होताना, 'तिचं' त्या दरबार हॉलमध्ये असणं महत्त्वाचं होतं.

रघुनाथ पांडे
कार्यकारी संपादक, एएम न्यूज

+91 9594993515AM News Developed by Kalavati Technologies