तोच हा फोटो..!

बरोब्बर, पाच वर्षांपूर्वी याच तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे शिक्कामोर्तब झाले होते. तोच हा क्षण!!

बरोब्बर, पाच वर्षांपूर्वी याच तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे शिक्कामोर्तब झाले होते. तेव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. तोच हा क्षण!! 
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या कोठीवरून दुपारी तीनच्या दरम्यान देवेंद्रजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील 2, मोतीलाल नेहरू प्लेस या बंगल्यात आले. किमान १०० कॅमेरे, २०० पत्रकार बंगल्यातील हिरवळीवर देवेंद्रजी आणि नितीनजींच्या या क्षणाची वाट बघत होते.

दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर ही मोठी घटना होती.

देवेंद्रजी बंगल्यावर आले, त्यांना खूप भूक लागली होती. आल्या आल्या त्यांनी जेवण केले. नितीनजींची आवडती शेवग्याची भाजी तिथे होती... सोबतीला दही आणि पोळ्यांचे तुकडे होते.. एका वाटीत कोंब आलेली मटकीची उसळ होती. कमळाच्या देठांची, कमलकाकडीची काश्मिरी पद्धतीची चटणी होती. मेथीचे फुलके होते... विविध प्रकारची लोणचीही होती. मेज सुंदर सजवला होता. कधी खुर्चीवर बसून तर क्षणात उभे राहून देवेंद्रजी जेवण करत होते. इतके सुपरफास्ट सुरू होते की एका क्षणी नितीनजी त्यांना म्हणाले, "देवेंद्र दमाने जेव.. तब्येत सांभाळ!!"
हे वाक्य इतके वडीलभावी होते की, त्यांनी खुर्चीवर बसून पुढची दहा मिनिटे जेवण केले.

मग नितीनजींच्या मागोमाग त्यांनी एक खोली गाठली. काही वेळ दोघांत तिथे चर्चा झाली. ती आटोपून देवेंद्रजी पुढच्या हॉलला लागून असलेल्या निमुळत्या पण आल्हाददायी पॅसेजमध्ये फिरत होते. मनाशीच हसत होते. बोटांची कांडी मोजत होते. तर्जनी गोलाकार फिरवत होते. कसले हिशेब चालले होते, ते त्यांनाच ठाऊक!
तेवढ्यातच नितीनजी खोलीतून बाहेर आले. त्यांच्या हाती एक वाटी होती, तीत कलाकंद होते. त्यातील एक चमचा त्यांनी काढून ते देवेंद्रजींच्या हातावर दिले.

तिथून पुढचा टप्पा सुरू होण्याच्या आतच पुन्हा एक वाटी आली. त्यातील दही-साखर बघून देवेंद्रजीचे डोळे लुकलुकले. चेहरा आनंदी झाला.. उजळलाच..! त्यांनी हसतमुख दोन चमचे दही-साखर खाल्ली.. तत्क्षणी त्यांनी खाली वाकून चरणस्पर्श केला. त्या दोघांतील ही भावभेट विलक्षण होती.

मग दोघेही पुढे निघाले. त्या सोबतीचा मी साक्षीदार होतो. माझ्यासोबत सुनील देवधर होते. देवधर त्रिपुराचे प्रभारी म्हणून काम बघत होते. पॅसेजमधून आम्ही थोडेच पुढे आलो, तर एक आणखी गंमत झाली...

एक जॅकेट आले... ते देवेंद्रजींना नितीनजींनी दिले. मागूनपुढून त्यांनी बघितले; रंग बघून त्यांनी आवडल्याची खूण केली.. क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा मंद स्मित करत त्यांनी ते घातले. नितीनजींनी पाठीवर थाप दिली, खांद्यावर थाप दिली.. दोघेही शांत हसले आणि स्वारी लॉन पुढच्या ओट्यावर येऊन थांबली.

रघुनाथ पांडे
कार्यकारी संपादक, एएम न्यूज

+91 9594993515AM News Developed by Kalavati Technologies