दारव्हा तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा उडाला बोजवारा

वृक्षारोपणाकरिता आणलेली रोपे फेकली झुडपात

यवतमाळ । शासनाच्या सामाजिक वनीकरणाच्या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून दारव्हा तालुक्यातील बोरी अरब व परिसरातील ग्रामीण भागाच्या अकृषक जागेवर झाडे लावण्याचा उपक्रम आहे. बोरीअरब येथील रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील जागेवर वृक्षारोपणाकरिता नविन झाडे लावण्यासाठी आणले असता सदर झाडे एका झाडाच्या झुडपांमध्ये फेकून देण्यात आल्याचा धक्क्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय ही पूर्ण झाडे लावल्याचे सांगून त्याचा निधी हडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
 
पर्यावरणाचा समतोल राखावा या उद्देशाने शासनस्तरावरून झाडे लावण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्याच अनुषंगाने बोरी परिसरात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडाची रोपे लावली गेली. कालांतराने काही रोपे पाण्याच्या अभावी किंवा देखरेखी अभावी सुकलेली आहे. याच सुकलेल्या झाडांच्या जागेवर दुसरे रोपे तयार करून लावण्याचा घाट घालण्यात आला. बोरी रेल्वे स्टेशन हद्दीतील काही ठिकाणी ही रोपे जुन्याच खड्ड्यात वरवर लावून बाकी सर्व झाडांची रोपे झुडपात फेकून देण्यात आली आहे. अशा प्रकारे शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांशी योजनेचा बोजवारा सरकारी यंत्रणाच उडवीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वृषप्रेमी जनतेकडून होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies